दापोली:- यंदा पावसाने दडी मारल्यामुळे दापोली तालुक्यावर तीव्र पाणीटंचाई आणि शेती नुकसानीचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर दापोली तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख आणि नगरसेवक ऋषिकेश रविंद्र गुजर यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पुढील ७ दिवसांत यावर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दापोलीकरांवर अन्याय झाल्याचा आरोप
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ३५८ पैकी ३१० तालुके शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३,२९५ मि.मी. पाऊस झालेल्या चिपळूण तालुक्याचाही १७ नोव्हेंबर २०२६ रोजी समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याच जिल्ह्यातील दापोली तालुक्याचा अद्याप यादीत समावेश नसल्याने हा दापोलीकरांवर उघड अन्याय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील गंभीर वस्तुस्थिती :

  • पावसाची मोठी तूट : दापोलीचा सरासरी पाऊस ३,८०० ते ४,००० मि.मी. इतका असताना, यंदा केवळ २,९५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे दडी मारली.
  • भूजल पातळीत घट आणि पाणीटंचाई : शासकीय अहवालानुसार सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ५.२२ मीटरने खालावली आहे. परिणामी, गावांमधील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडू लागल्या असून लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.
  • शेती आणि बागायतीचे नुकसान : पावसाच्या खंडामुळे भाताचे पीक करपले असून दाणे भरण्याच्या अवस्थेतच वाळले आहे. जमिनीत ओलावा नसल्याने आंबा व काजूच्या पुढील हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच नारळ-सुपारीची झाडे सुकू लागली असून जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण झाली आहे.
    निवेदनातील प्रमुख मागण्या :
    १. तालुक्यातील मंडळनिहाय पर्जन्यमान, पीक पाहणी (पैसेवारी) व पाणीटंचाईचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा.
    २. दापोली तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
    ३. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, तसेच टँकरने पाणीपुरवठा व चारा छावण्या सुरू करणे यांसारख्या दुष्काळी सवलती लागू कराव्यात.
    जर दापोली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर शेतकरी पीक विमा आणि शासकीय मदतीपासून वंचित राहतील व याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही गुजर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
    यावेळी निवेदन देण्याकरिता संदीप चव्हाण, naदापोली तालुक्यातील शेतकरी बंधू तसेच मोठ्या संख्येने जनता हजर होती.