मुंबई- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री सरनाईक यांनी यावेळी मांडली. एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबरोबरच इतर आर्थिक आणि सेवा-संबंधित मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे बोनसची घोषणा झाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी इतर मागण्यांबाबत दिवाळीनंतर होणाऱ्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, १० हजार रुपयांच्या बोनसच्या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीपूर्वी बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद घेण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.