
चिपळूण (संतोष पिलके ) : जिद्द, चिकाटी, शारीरिक क्षमता आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर चिपळूणचे क्रीडापटू आंतरराष्ट्रीय स्तरावरील कठीण स्पर्धांमध्ये आपली छाप पाडत आहेत. गोवा येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या हाफ आयर्न मॅन (70.3) स्पर्धेत डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, त्यांनी आतापर्यंत एकूण सात हाफ आयर्न मॅन आणि दोन फुल आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.
हाफ आयर्न मॅन (70.3) ही अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा असून यामध्ये १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे असे तीन क्रीडाप्रकार सलगपणे पूर्ण करावे लागतात. हे तिन्ही टप्पे निर्धारित साडेआठ तासांच्या मर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असते.
डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी या स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी नोंदवताना १.९ किलोमीटर पोहणे ४९ मिनिटांत, ९० किलोमीटर सायकलिंग ३ तास ९ मिनिटांत, तर २१ किलोमीटर धावणे २ तास १२ मिनिटांत पूर्ण केले. अशा प्रकारे त्यांनी अवघ्या ६ तास २६ मिनिटांत संपूर्ण स्पर्धा पूर्ण केली.
या स्पर्धेतील आव्हानेही तितकीच कठीण होती. समुद्रातील पोहण्याच्या टप्प्यात पाण्याचे वेगवान प्रवाह सामना करावा लागला. तर धावण्याचा २१ किलोमीटरचा टप्पा दुपारच्या कडक उन्हात आणि चढ-उताराच्या मार्गावर पूर्ण करावा लागला. या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद आहे.
श्री. प्रसाद दीपक आलेकर ‘हर्बल लाईफ वॉरियर्स टीम चे मिक्स रिले प्रकारात उल्लेखनीय कामगिरी
दरम्यान, चिपळूण सायकलिंग क्लब व संघर्ष क्रीडा मंडळाचे श्री. प्रसाद दीपक आलेकर यांनीही मिक्स रिले प्रकारात ‘हर्बल लाईफ वॉरियर्स’ टीमकडून सहभागी होत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रसाद आलेकर यांनी ९० किलोमीटरचे सायकलिंग अवघ्या २ तास ५३ मिनिटांत पूर्ण केले. सायकलिंगचा मार्ग उंच-सखल भागातून जात असल्याने तसेच समोरून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक ठरला.
या टीममधील श्रीतेज यांनी १ तासात समुद्रातील पोहण्याचा टप्पा, तर प्रियांका यांनी २ तास ३० मिनिटांत २१ किलोमीटर धावण्याचा टप्पा पूर्ण केला. या तिघांनी मिळून ६ तास ३३ मिनिटांत संपूर्ण स्पर्धा पूर्ण करत कॉर्पोरेट टीम मिक्स रिले प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
चिपळूणच्या या दोन्ही क्रीडापटूंनी गोव्यात मिळवलेल्या यशाबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब, संघर्ष क्रीडा मंडळ आणि चिपळूण हाफ मॅरेथॉन रनर्स ग्रुप यांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. कठीण स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर चिपळूणच्या क्रीडापटूंनी मिळवलेले हे यश निश्चितच युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.