दापोली : सरोदे समाज युवा संघटना, दापोली शहर यांच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘ दीपसंध्या – पर्व दुसरे’ हा स्नेहमेळावा दिनांक 05/11/2026 रोजी सोहनी शाळा हॉल मध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष श्री. अमित वाखंडे यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री दादा इदाते, श्री. भागवत साहेब, पंचायत समिती सदस्य श्री. भाऊ इदाते, सरोदे समाज पतपेढीचे अध्यक्ष श्री. सुभाष क्षीरसागर,श्री. शांतिनाथ महाराज,सरोदे समाज विकास सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. लवू साळुंखे तसेच महिला अध्यक्षा सौ. शीतल भागवत व आप्पासाहेब आयरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. दीपावलीच्या मंगलमय वातावरणात संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि आपुलकीने रंगून गेला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या संगीत रजनीमध्ये समाजातील विविध क्षेत्रांतील कलाकारांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक करत संघटनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दीपसंध्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची व यशस्वी अंमलबजावणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रकल्पप्रमुख श्री. भरत रसाळ यांनी सांभाळली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन श्री. संदिप क्षिरसागर यांनी केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा आनंदात संपन्न झाला.