मुंबई : अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यावर गोळीबाराच्या तपासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. पण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे अशी मागणी करणाऱ्या जनाब संजय राऊत, यांना सवाल आहे, महाविकास आघाडीचे सरकार होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्रात जंगलराज होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना दरमहा 100 कोटींच्या वसुलीचे लक्ष दिले होते. ज्यांचा कारभार गुंडगिरी आणि माफियागिरीच्या भरोशावर चालत होता अशा लोकांना टीका करण्याचा काय अधिकार, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या पापांचा पाढाच यावेळी त्यांनी वाचला.
पालघरमध्ये 16 एप्रिल 2020 रोजी दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची मॉब लिंचिंग करून हत्या करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. याला जंगलराज म्हणतात. त्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती. 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार कशाप्रकारे झाला, हे आपण सर्वांनी पाहिले. 8 जून 2020 रोजी दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण घडल्यानंतर आजही त्यांचे वडील न्याय मागत आहेत. संजय राऊत, जंगलराज काय असते, हे दिशा सालियन यांच्या प्रकरणावरून आठवा. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचे कृत्य गुंडांकरवी नव्हे, तर सचिन वाझे नावाच्या पोलिसाकरवी तुम्ही केले होते, याला माफियाराज आणि जंगलराज म्हणतात, असे श्री. बन म्हणाले.
टायगर श्रॉफ प्रकरणात गोळीबारानंतर तातडीने मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे, असे सांगत श्री. बन यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातील मुंबईतील गुन्ह्यांची आकडेवारीच पत्रकार परिषदेत सादर केली. 2020 मध्ये मुंबईत नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या 51,058 होती, तर 2019 मध्ये ही संख्या 64,656 इतकी होती. हत्या, खंडणी, बलात्कार आणि विनयभंग अशी शेकडो प्रकरणे घडली होती. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागले. मुख्यमंत्री किंवा महायुती सरकारकडे एक बोट दाखवत असताना उरलेली चार बोटे आपल्याकडे आहेत, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे.
देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री म्हणून अतिशय सक्षम आहेत. 2014 ते 2019 या काळात पूर्णवेळ गृहमंत्री असताना त्यांनी अतिशय चांगला कारभार केला. आताही ते गृहमंत्री म्हणून आपले सरकार अतिशय सक्षमपणे चालवत आहेत. ज्यांचे गृहमंत्री आपल्याच पोलिसांना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट देत होते, त्यांनी देवाभाऊंवर टीका करू नये. संजय राऊत, अंडरवर्ल्डला संपवण्याचे काम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी केले होते आणि देवाभाऊ गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य आहेत. त्यामुळे आता या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याचे आणि त्यांना जेरबंद करण्याचे काम देवाभाऊच करतील. मुंबई पोलीस आपल्या कर्तृत्वाने कोणाच्याही बापाला सोडणार नाहीत, असे श्री. बन यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंचे समर्थन केले होते हे राऊत विसरले का ?
ठाण्यातील मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत सापडला होता. सचिन वाझे यांची या संपूर्ण प्रकरणातील भूमिका संशयास्पद होती. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळी ‘वाझे काय लादेन आहे का?’ असे म्हणत त्या प्रकरणातील आरोपी वाझे यांचे समर्थन करण्याचे काम मार्च 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य आणि बदल्यांचे घोटाळे हे तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात घडले होते. त्याला माफियाराज आणि जंगलराज म्हणतात. पण दुर्दैवाने संजय राऊत, उद्धवजी ठाकरे,रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनाही त्याचा विसर पडला असल्याचे श्री. बन यावेळी म्हणाले.
