देवरुख (सुरेश सप्रे) : श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठेकेदाराने रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. त्यातच अचानक झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी आणि चिखल साचला असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

रस्त्यावरील पर्यायी व्यवस्था अत्यंत थातूरमातूर असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आंगवली मार्लेश्वर या रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू असून कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक, बॅरिकेड्स किंवा वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नाहीत. खोदलेल्या रस्त्यावर गुडघाभर चिखल आणि पाणी साचल्याने दुचाकीस्वारांसह पायी चालणेही मुश्किल झाले आहे.
“ठेकेदाराने खोदून ठेवलेला रस्ता तसाच सोडला. पावसाचे पाणी साचून तलाव झाला आहे.
कामासाठीची मोठी वाहने बेदरकारपणे चालवली जातात. एका महिन्यात तीन मोठे अपघात झाले तरी संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्त्याच्या कामामुळे लहान वाहनांना वाट काढणे कठीण झाले आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असा संताप वाहनधारकांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असतें मात्र रूंदीकरणाच्या कामामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता मार्लेश्वरकडे जाणारी वाहतूक अक्षरशः ठप्प झाली आहे. अनेक भाविकांची वाहने चिखलात रुतून बंद पडत आहेत.
ठेकेदार व प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ व वाहनचालक आणि सर्वसामान्य भाविकांनामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून पर्यायी पक्की व्यवस्था करावी , अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
यावर तातडीने दखल घेऊन उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे