खेड : कर्तव्यावर जाताना गृहरक्षक दलाचे जवान , तालुक्यातील चिंचघर – प्रभुवाडी येथील सचिन हरिश्चंद्र कडू यांचा गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तालुक्यातील बोरघर घोलपवाडी येथील पिनाक हॉटेलजवळ दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात जखमी झालेल्या सचिन कडू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजून ७ मिनिटांनी बोरघर घोलपवाडी परिसरातील पिनाक हॉटेलजवळ हा अपघात घडला. सचिन कडू हे एमएच ०८ बीडी ५१७० क्रमांकाच्या दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच जय हिंद अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जखमी सचिन कडू यांना तातडीने कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. कर्तव्यावर जात असताना होमगार्डचा अपघात झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सचिन कडू यांच्या प्रकृतीबाबत तसेच अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कर्तव्यावर जाताना गृहरक्षक दलाचे जवान सचिन कडू यांचा अपघात…!
