सावर्डे : आधुनिक काळात झपाट्याने वाढणारे औद्योगीकरण, अनियंत्रित शहरीकरण, लोकसंख्यावाढ आणि उपभोगवादी जीवनशैली यांमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. उद्योगधंद्यांचा विस्तार, शहरांची वाढ, जंगलतोड, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्याद वापर, पाण्याचे प्रदूषण, हवेची खालावणारी गुणवत्ता, प्लास्टिकचा वाढता वापर आणि कचऱ्याच्या समस्येमुळे पर्यावरणापुढे अनेक गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत.

विकासाच्या प्रक्रियेत निसर्गाचा केवळ उपभोग घेण्याऐवजी त्याच्याशी मानवी जीवनाचा आधार म्हणून पाहणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही काळाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांनी केले.सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे येथे आयोजित ‘निसर्गस्नेही जगू या सारे’ या उपक्रमांतर्गत ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य टी. वाय.कांबळे यांनी पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी व पौर्णिमा कुलकर्णी यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिलीप कुलकर्णी म्हणाले मानव हा निसर्गाचा मालक नसून निसर्गव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी आणि जैवविविधता या सर्व घटकांच्या परस्पर सहकार्यावर पृथ्वीवरील जीवन अवलंबून आहे.

औद्योगीकरण आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेत विकास साधताना पर्यावरणीय मर्यादांचे भान ठेवणे आवश्यक असून विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम संपूर्ण मानवी समाजाला भोगावे लागतात. त्यामुळे निसर्गाकडून केवळ संसाधने मिळविण्याचा दृष्टिकोन न ठेवता निसर्गाचे ऋण जाणून त्याचे जतन करण्याची वृत्ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.तसेच आजच्या उपभोगवादी जीवनशैलीमुळे माणसाच्या गरजा वाढत असून त्यातून नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. गरज आणि हौस यांमधील फरक ओळखून वस्तूंचा मर्यादित वापर करणे, अनावश्यक खरेदी टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, विजेची बचत करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करणे या छोट्या वाटणाऱ्या कृतींमधूनही पर्यावरण संवर्धनाला मोठे योगदान देता येते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.तर पौर्णिमा कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पर्यावरणपूरक जीवनशैली ही केवळ चर्चेचा किंवा भाषणाचा विषय न राहता ती आपल्या दैनंदिन आचरणाचा भाग झाली पाहिजे, असे नमूद केले. घर, महाविद्यालय आणि समाज या तिन्ही स्तरांवर पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

युवकांनी पर्यावरणविषयक प्रश्नांकडे केवळ माहिती म्हणून न पाहता त्याविषयी संवेदनशीलता निर्माण करून स्वतःच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे. स्वतः बदलणे आणि आपल्या कृतीतून इतरांनाही प्रेरित करणे, हाच पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून साधेपणा, काटकसर, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना यांवर आधारित जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला. ‘निसर्गस्नेही जगू या सारे’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि निसर्गसंवर्धनाची प्रेरणा निर्माण करणारा ठरला. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ.दिप्ती शेंबेकर, प्रा. जयसिंग चवरे, प्रा.संकेत कुरणे, प्रा.अवनी कदम प्रा.पुजा आवले, तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा.माधुरी जाधव यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील जावीर यांनी केले.