खेड : – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे एस. टी. चे चालक वाहक यांच्या कामात अडथळा आणून मारहाण केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सनी संजय नलावडे व कौस्तुभ पाटणे (दोघेही रा. खेड) या दोघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना दि. १६ मे २०२६ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद महादेव माने (वय-४२, चालक-वाहक-रोहा एस. टी. आगार, रा. मु.पो. नेरले, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. रोहा एस.टी. आगार) हे आपल्या ताब्यातील एस. टी. बस क्रमांक एम. एच.१४ के. क्यु. ३९७० हे चिपळूण ते खेड अशी घेवून येत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे समोरून येणारी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाडी क्रमांक एम.एच. ४६ए. यु. ३७१७ यावरील चालक याने त्याच्या वाहनाची लाईट फियादी श्री. माने यांच्या डोळ्यावर मारली त्यावेळी फिर्यादी यांनी अपर डिपर लाईटचा इशारा दिला परंतु आरोपीने त्याच्या गाडीचा प्रकाश कमी केला नाही. उलट संशयित आरोपी सनी नलावडे व कौस्तुभ पाटणे या दोघांनी एस. टी. बसच्या ड्रायव्हर साईटचा दरवाजा उघ‌डून फिर्यादी यांना बाहेर ओढून हाताच्या चापटाने कानाखाली मारहाण केली तसेच त्यांना खाली पाडून मारहाण केली त्यामुळे त्यांच्या उजव्या डोळ्याला तसेच डोक्याला जखम होऊन दुखापत झाली आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.