माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या ‘श्यामची मम्मी’ या नाट्यप्रयोगाने रसिकांची मने जिंकली. कै. अशोक पाटोळे यांच्या अजरामर लेखणीतून साकारलेल्या ‘श्यामची मम्मी’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण रत्नागिरी येथील हौशी कलाकारांनी केले.
याचे दिग्दर्शन प्रशांत घाणेकर, नेपथ्य व रंगभूषा श्री. सत्यजित गुरव, प्रकाशयोजना निनाद बेहरे, पार्श्वसंगीत प्रशांत भिडे, तर ध्वनी संयोजन रवींद्र मांडवकर यांनी केले. हौशी कलाकारांनी काम केले असले तरी व्यावसायिक नाटक वाटावे अशी कलाकारांची तयारी होती. प्रत्येक कलाकाराने जीव ओतून भूमिका केल्याने अनेक विनोदी प्रसंगांत रसिक खळखळून हसत होते व टाळ्यांचा कडकडाट करत होते. तर भावनिक क्षणी रसिकांच्या डोळ्यांच्या कडा टचकन पाणावत होत्या.
श्याम म्हणून त्याची भूमिका आणि आई म्हणून तिला वाटणारी तळमळ या दोन्ही गोष्टी उत्कृष्ट सादर झाल्या. ट्युशन टीचर म्हणून साकारलेली संजय बापट यांची भूमिका लक्षवेधी ठरली. बेळगावी जोडप्याची भूमिका ऐश्वर्या पेंडसे-सहस्त्रबुद्धे व विश्वास आठवले यांनी अप्रतिम सादर करत नाटकात रंगत आणली. या नाट्यप्रयोगात प्रशांत घाणेकर, सुमित घाणेकर, विजय ताम्हणकर, योगेश सहस्त्रबुद्धे, देवाशिष बापट, संध्या घाणेकर, विदुला घाणेकर, निशा लिमये, विघ्नेश घाणेकर आदींनी काम केले. दोन अंकी नाट्यप्रयोग बघता बघता केव्हा संपला हे प्रेक्षकांना कळलेच नाही. नाट्यप्रयोगानंतर ‘वंदे मातरम्’ झाले व देवस्थानतर्फे श्रीकांत फाटक यांनी आभार मानले.
