चिपळूण: नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणाऱ्या आणि नावाजलेल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षांचा त्याग करून भाजपाचा झेंडा हाती घेतला. प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व मंडळींनी भाजपात प्रवेश केला. त्या सर्वांना शुभेच्छा देऊन कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निमित्ताने प्रशांत यादव यांचे नेतृत्व अधिक बळकट, मजबूत आणि खंबीर होताना दिसून येत आहे.

काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील अनेक प्रमुख चेहरे भाजपमध्ये दाखल झाले.खेर्डी येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना (उबाठा) चे माजी उपशहर प्रमुख समीर टाकळे, महिला आघाडीच्या क्षेत्र अध्यक्षा स्वाती देवळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपची अधिकृत सदस्यता स्वीकारली. याशिवाय काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) च्या माजी युवती जिल्हाध्यक्षा प्रणिता घाडगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या अल्पसंख्यांक सेलचे उपशहर अध्यक्ष मुख्तार पठाण यांचाही या प्रवेशात समावेश होता. हा पक्षप्रवेश २८ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत होणार होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील दुर्दैवी निधनामुळे मुख्यमंत्री दौरा तसेच नियोजित सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे आज शनिवारी कोणताही गाजावाजा न करता हा पक्षप्रवेश सोहळा खेर्डी येथे साध्या स्वरूपात पार पडला.

यावेळी उपस्थितांनी भाजपची विकासाभिमुख भूमिका, संघटनात्मक शिस्त आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.चिपळूणच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचे मत नव्याने पक्षात दाखल झालेल्या नेत्यांनी व्यक्त केले. या पक्षप्रवेशामुळे येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद अधिक वाढणार आहे.या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सौ. स्वप्ना यादव, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष व नगरपालिकेतील भाजप गटनेते शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत मोदी यांनी केले, तर आभार प्रदर्शन बळीराम मोरे यांनी आभार मानले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY