मुंबई दि. ६ मार्च – यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत.
२०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. बळीराजाला कर्जमाफी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, सामाजिक लाभाच्या योजना, पायाभूत सुविधांचे महत्वाकांक्षी प्रकल्प, उद्योग आणि रोजगारासह जागतिक शिक्षणांच्या संधी देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे अजितदादांच्या महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा दृढ संकल्प आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
देशात विविध क्षेत्रात अव्वलस्थानी असणाऱ्या महाराष्ट्राला जगाच्या स्पर्धेत आधुनिक आणि विकसित महाराष्ट्र म्हणून ओळख देणारा अर्थसंकल्प म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याकडे पाहतो आहे. २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डाॅलर करण्याचा निर्धार आणि आत्मविश्वास या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आला आहे ही महाराष्ट्राच्या जमेची बाजू आहे. सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अजितदादांच्या अनुपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली. पण, अजितदादांच्या संकल्पनेतील आणि करड्या आर्थिक शिस्तीसह महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दृष्टीकोनाची छाप या अर्थसंकल्पात उमटली असल्याचे समाधान आहे. या अर्थसंकल्पाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनिल तटकरे यांनी धन्यवाद दिले आहेत.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
