पाली /बेणसे :. (धम्मशील सावंत )छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाचे पद भूषवणारे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील समाधी वृंदावनाचा ऐतिहासिक उलगडा झाला आहे. या महत्त्वपूर्ण शोधावर आधारित शोधनिबंध ‘कोकण इतिहास पत्रिका’ (अंक १, जानेवारी-मार्च २०२६) मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
याचे प्रकाशन संत गोन्सालो गार्सिया कला व वाणिज्य महाविद्यालय, वसई येथे नुकतेच करण्यात आले. इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर आणि सुधागड तालुक्यातील संदीप परब यांनी संयुक्तपणे हा सखोल अभ्यास पूर्ण केला आहे. कोकणच्या विशेषतः मराठा कालखंडातील इतिहासाच्या दृष्टीने हा शोध अत्यंत मोलाचा मानला जात आहे.
या शोधनिबंधासाठी संशोधकांनी केवळ मौखिक परंपरांवर अवलंबून न राहता, भक्कम ऐतिहासिक पुराव्यांची मांडणी केली आहे. यामध्ये ऐतिहासिक कागदपत्रे, उपलब्ध पत्राचार आणि समकालीन दप्तरांचा चिकित्सक अभ्यास. महसुली नोंदी सन १८७४ मधील वृंदावन नोंदी आणि १९५४-५५ चे ७/१२ उतारे यांचा आधार घेण्यात आला आहे. तसेच सर्व्हे नकाशांच्या आधारे नारोपंत अमात्य यांची समाधी नेमकी श्री कुणकेश्वर मंदिरालगत असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे या परिसराशी आणि कुणकेश्वर देवालयाशी अमात्यांच्या वंशजांचा असलेला दीर्घकालीन संबंध या संशोधनातून अधोरेखित झाला आहे.
हा शोधनिबंध इतिहासप्रेमी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोकणच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. अधिक माहितीसाठी संपर्क रणजित हिर्लेकर: ९४२३३०३६७०, संदीप परब: ९९३०६६३५५९
इतिहासाला नवी दिशा नारोपंत नीलकंठ यांनी स्वराज्याच्या प्रशासनात अमात्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यांच्या समाधी स्थानाबाबत अनेक वर्षे अनभिज्ञता होती. हिर्लेकर आणि परब यांच्या या प्रयत्नांमुळे आता कुणकेश्वर येथील त्या वृंदावनाला ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली आहे. या निष्कर्षांमुळे कोकणातील मराठा इतिहासाच्या अभ्यासाला एक नवे परिमाण मिळाले असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही या स्थानाचे महत्त्व वाढणार आहे.
प्रशासकीय वारसा व पाच छत्रपतींसोबत काम नारोपंत नीलकंठ अमात्य हे स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार नाव. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळापर्यंत अत्यंत सक्रिय आणि निकटवर्तीय प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली. सहा पिढ्यांच्या कालखंडात त्यांचा प्रशासकीय दरारा आणि निष्ठा कायम होती.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
