खेड ( दिवाकर प्रभु ) : – मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिपळूण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद हालचाली करत असलेल्या तिघांना दहा किलो गांजासह अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तीनही आरोपी खेड येथील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि पथकाला वालोपे चिपळूण येथील रेल्वे स्टेशन फाट्यानजीक मुंबई गोवा महामार्गावरील सबवे याठिकाणी रिक्षा चालक आणि मोटार सायकल स्वार हे आपसात बोलताना व शंकास्पद हालचाली आढळून आल्याने त्यांच्या जवळ जाऊन चौकशी करून पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांच्याकडे १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा दोन लाख त्रेपन्न हजार चारशे पन्नास किमतीचा काळपट हिरवट रंगाचा पाने फुले बोंडे काड्या व बिया असलेला उग्र वासाचा गांजा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच त्यांच्या ताब्यातील दोन वाहने व इतर साहित्य मिळून ४,६८, ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आकाश विजय जाधव वय ३०, शिवकुमार भास्कर ठाकरे वय ४८, शंकर विनोंद पारदे वय ३१ वर्ष (तिघे रा. सुकीवली., तालुका – खेड) यांच्याविरुद्ध एन. डी. पी. एस. ऍक्ट १९८५ चे कलम ८ ( क ), २० ( ब ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, सहाय्यक पोलीस सुभाष सुभाष भागणे, शांताराम झोरे, दिपराज पाटील, प्रवीण होवाळ यांच्या पथकाचा समावेश होता.