मुंबई : दादांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, युवा नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्यसरकारकडून पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सर्व चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस सीबीआयमार्फत करु इच्छित आहे त्यासंदर्भात पाऊले उचलली जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.

निवेदनात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :
गंभीर अनियमितता आणि संशयास्पद परिस्थिती
नोंदवलेले आणि गोळा केलेले विविध तथ्ये, महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात, ज्यात हे समाविष्ट आहे परंतु इतकेच मर्यादित नाही:

अ) उड्डाण क्रू रचनेत शेवटच्या क्षणी झालेले बदल, ज्यासाठी ऑपरेशनल निर्णय घेण्याची आणि अधिकृततेची तपासणी आवश्यक आहे,

ब) हवाई वाहतूक नियंत्रण संप्रेषण आणि धावपट्टीच्या मंजुरीच्या क्रमवारीशी संबंधित स्पष्ट विसंगती

क) गंभीर ऑनबोर्ड सुरक्षा चेतावणी प्रणालींच्या कार्यप्रणाली आणि अखंडतेबद्दल चिंता

ड) लँडिंग टप्प्याच्या जवळ असूनही कोणत्याही रेकॉर्ड केलेल्या संकट संप्रेषणांची अनुपस्थिती

ई) क्रू फिटनेस, देखभाल, अनुपालन आणि विमान प्रणालींसह फॉरेन्सिक मूल्यांकन आवश्यक असलेल्या बाबी. आदी.

ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्याचवेळी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यापूर्वी अशा घटनांसाठी स्वायत्त यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्या यंत्रणांनी तपास सुरू केल्याचे घोषित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वायत्त यंत्रणा तपास करत आहेत पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो. ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळी बाह्य देशातील यंत्रणाही अपघाती प्रकरणाचा तपास करत असतात असे सांगतानाच या प्रकरणाचा सखोलतेने तपास व्हावा. जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा तपास व्हावा आणि निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातील नव्हे तर देशातील जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती म्हणून कशापध्दतीने वाटचाल करु शकतो याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत आजच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

भाजपला काय वाटते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची काय भूमिका आहे याबद्दल चर्चा झाली. ही चर्चा समाधानकारक व सौहार्दाची झाली असून भाजप आमचा एनडीएमधील प्रमुख पक्ष आहे. साहजिकच मित्रपक्षांचा सन्मान, आदर करुनच ही चर्चा झाल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाल्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश कार्यालयात भेट घेतली असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY