उरण (विठ्ठल ममताबादे ) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फ्रेंड्स ऑफ नेचर या पर्यावप्रेमी व निसर्ग प्रेमी संस्थे तर्फे आगळीवेगळी धुळवड साजरी केली. फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर-उरणचे सदस्यांच्या सहकार्याने वन्यजीव अधिवासातील मृतप्राय झालेल्या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो.

चिरनेर येथील फॉन संस्थेच्या ‘श्री बापूजी देव देवराई’ प्रकल्पातील केलेल्या वृक्षारोपणाची मशागत,साफसफाई तसेच परिसरातील “पेरीचे पाणी” या पारंपरिक पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून झऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. अनेक वर्षांपूर्वी या पाणवठ्याचा उपयोग स्थानिक आदिवासी कातकरी समाज पिण्याच्या पाण्यासाठी करीत होता; परंतु वापर बंद झाल्याने ते गाळाने पूर्णपणे बुजले जातात.दरवर्षी प्रमाणे या वर्षीही संस्थेने यावर्षीही सातत्याने गाळ काढून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुनर्संचयित केला व वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती.मागील सहा वर्षांपासून धुलिवंदनाच्या दिवशी संस्था निसर्गनिर्मित पण सुप्तावस्थेत गेलेल्या पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा उपक्रम सातत्याने राबवत आहे. आपल्याकडे असे मानले जाते की होळीनंतर उष्णता वाढते ; मात्र आजच्या परिस्थितीत जंगलतोड हे तापमानवाढीचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने जलसाठे लवकर आटतात आणि पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते.
मानव आपल्या गरजेसाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो; परंतु जंगलातील वन्यजीवांसाठी हे शक्य नसते. पाण्याच्या शोधात ते मानववस्तीच्या जवळ आले, तर अपघात, मानव-वन्यजीव संघर्ष किंवा शिकार,इ.धोका संभवतो. या संभाव्य धोक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक अधिवासातच जलस्रोत उपलब्ध करून देण्यासाठी फॉन संस्था हा उपक्रम गेली ६ वर्षे राबवत आहे.
आजतागायत फॉन संस्थेतर्फे कडापे डोंगर,साई डोंगर,चिरनेर पोंडा,पेरीचे पाणी (चांदायले वाडी),श्री बापूजी देव देवराई, चिरनेर ठिकाणी पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.उरण पूर्व विभाग परिसरातील अधिवासांमध्ये जलसंवर्धनाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली होणारी अमर्याद वृक्षतोड, डोंगरांचे सपाटीकरण आणि मानव निर्मित वणव्यांची समस्या लक्षात घेता, अशा उपक्रमांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते.आपण आपल्या परंपरा जपत प्रतीकात्मक व पर्यावरणपूरक होळी साजरी करू शकतो. बदलत्या काळानुसार विचारांत परिवर्तन करून निसर्गावरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपआपला वाटा उचलणे आवश्यक आहे — हाच या उपक्रमाचा शुद्ध हेतू व त्याप्रमाणे संस्था दरवेळेस लोकांना अशी निसर्गपूरक होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन करते. व इतरांप्रमाणे होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोरडी होळी खेळत रंगासोबत निसर्गाशी आपलं नातं असे निसर्गपूरक उपक्रम साजरे करून अधिक घट्ट करूया!असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून फ्रेंड्स ऑफ नेचर ही संस्था देत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
