लांजा ; तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे तसेच इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. लांजातील कर्मचारीही आंदोलनात सहभागी असल्याने लांजा भूमी अभिलेख कार्यालयात शुकशुकाट पसरला असून दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.
राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हे आंदोलन टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १८ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून कामकाज करत निषेध नोंदवला. त्यानंतर २० फेब्रुवारीपासून मोजणीसाठी लागणारे साहित्य कार्यालयात जमा करून केवळ कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात आले. आता २३ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले असून हे आंदोलन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या आंदोलनामुळे प्रत्यक्ष जमिनीच्या मोजणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. परिणामी नागरिकांची जमीन मोजणी आणि संबंधित प्रकरणे रखडली असून सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. शासन आणि संघटनेदरम्यान तोडगा न निघाल्यास भूमी अभिलेख विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आंदोलनाचा परिणाम येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे ठरत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
