लांजा: भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कर्मचारी आंदोलन करणार असून १८ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये लांजा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी ही सहभागी होणार असून या आंदोलनाची दखल घेतली न घेतल्यास २ मार्चपासून संपूर्ण कामकाज बंद आंदोलन सुरू केले जाणार आहे.

याबाबत भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील जमाबंदी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या आदेशान्वये अद्यापही तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत मंत्रालय, मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते.

मात्र, दीडशे दिवसांचा कालावधी झाला तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत. विभाग व शासनस्तरावरून याबाबत केवळ वेळकाढूपणा सुरू असून कर्मचाऱ्यांच्या संविधानिक न्याय हक्कांवर गदा आणण्याचे व दबावतंत्राचा वापर करून काम सुरू आहे. त्यामुळे संघटनेने मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविणार…

संघटनेच्या निवेदनानुसार, भूमी अभिलेख कर्मचारी १८ फेब्रुवारीला कार्यालयात मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून कामकाज करतील. २० फेब्रुवारीपासून मोजणी काम बंद ठेवून काळ्या फिती लावून फक्त कार्यालयीन कामकाज करतील, २३ ते २६ फेब्रुवारी या काळात सामूहिक रजा आंदोलन करतील तसेच २७ फेब्रुवारी रोजी जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा आयोजित करून धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून संपूर्ण बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनात लांजा भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार देवाशीष सुवरे, भूकरमापक तुषार कदम, परिरक्षण भूमापक काशीनाथ कुमठेकर, भूकरमापक शुभम कुरळपकर, निमतानदार शितल कांबळे, भूकरमापक संकेत सणस, अभिलेखपाल किर्ती नार्वेकर, परिरक्षण भूमापक सुशिल तळेकर, कनिष्ठ लिपिक प्रतिभा कचरे आणि शिपाई संदीप पोमेंडकर आदी सहभागी होणार आहेत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY