महाड (मनोज खांबे) : शहर व परिसरात अनधिकृत भंगार गोदामांचा वाढता प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच महाड एमआयडीसी परिसरातील टेमघर गावाजवळील एका भंगार गोदामाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. ही घटना ताजी असतानाच काल दुपारी नडगाव गावाच्या हद्दीत आणखी एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास संबंधित भंगार गोदामातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. गोदामात प्लास्टिक, रबर, लोखंडी व इलेक्ट्रॉनिक भंगारासह ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्याने आगीचे लोट आणि धुराचे प्रचंड ढग आकाशात उसळताना दिसत होते. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महाड नगरपरिषद अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायंकाळपर्यंत अथक प्रयत्न केले. पाण्याचा मारा आणि सुरक्षा उपाययोजना राबवत आग आटोक्यात आणण्यात यश आले. पोलिसांनीही परिसरात बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत महाड शहर आणि एमआयडीसी परिसरात भंगार गोदामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गोदामे अनधिकृतरीत्या सुरू असून सुरक्षेचे कोणतेही ठोस नियम पाळले जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून अनधिकृत भंगार गोदामांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. “या गोदामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा सवाल आता महाडकरांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित शासकीय यंत्रणांनी यापूर्वीच्या घटनांमधून धडा घेत ठोस कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY