मुंबई, दि. ६ मार्च – राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि व्हिजन डॉक्युमेंटची प्रभावी अंमलबजावणी करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दरम्यान मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आदरणीय दादांचे उचित स्मारक उभारण्याबरोबरच त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा ही दादांना अर्पण केलेली योग्य श्रद्धांजली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख आधारस्तंभांवर राज्याचा विकास साधण्याची दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येते. आदरणीय अजितदादा पवार यांनी मांडलेल्या प्रगत आणि विकासाभिमुख संकल्पनांशी सुसंगत अशी विकासाची दिशा या अर्थसंकल्पातून पुढे आली असून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
राज्याच्या विकासात शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. कृषी क्षेत्राला बळकटी देणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विस्तार करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.भांडवली खर्चात सुमारे २० टक्क्यांची भरीव वाढ केल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून महाराष्ट्र देशातील अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून अधिक बळकट होईल, असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एक टक्का निधी राखून ठेवण्याचा निर्णय हा आदरणीय दादांच्या संवेदनशील विचारांचे प्रतिबिंब असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाच्या स्मारकाचे काम यावर्षी पूर्ण करण्यात येणार असून सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली विकास आराखड्यासाठीही विशेष तरतूद करण्यात आल्याचे नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देत ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी भरीव तरतूद, एकल महिलांच्या कल्याणासाठी धोरण तसेच ‘लखपती दीदी’ उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढविण्यासाठीही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ग्रोथ हब उभारण्याची योजना तसेच अमृतकालीन रस्ते विकास योजना आणि मेट्रो प्रकल्पांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे सांगतानाच राज्याच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत वाढ करण्यात आली असून त्यामध्ये आदरणीय दादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीसाठी बृहद आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी ३६० खाटांचे नवे रुग्णालय, नर्सिंग कॉलेज आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुक्यांमधील अवर्षणप्रवण भागांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठा व सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतीला मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणारा असून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग देणारा ठरेल. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
