पेण(प्रशांत पोतदार) : बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर सहाव्या दिवशी तूर्तास स्थगिती देण्यात आली. खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.
पेण येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणस्थळी खासदार सुनील तटकरे यांनी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाची भूमिका, पुनर्वसन कायदा, मोबदल्याचा मुद्दा तसेच सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्याची मागणी या सर्व बाबींवर सखोल विचारविनिमय करण्यात आले.
यावेळी खासदार तटकरे यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. शुक्रवार, दिनांक ६ मार्च रोजी मंत्रालयात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सिडको अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती त्यांनी केली.
“प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास मी स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसेन,” असा ठाम इशाराही खासदार तटकरे यांनी दिला. बैठकीत सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बाळगंगा धरण प्रकल्पामुळे बाधित शेतकरी अनेक वर्षांपासून न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. खासदार तटकरे यांच्या भेटीमुळे आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी खासदार तटकरे यांनी उपोषणकर्ते संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव, वासुदेव पाटील आणि मधुकर हादगे यांना अखेर सहाव्या दिवशी नारळ पाणी देत उपोषण सोडवले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर,पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, रा जि प डी बी पाटील, व स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली १६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व प्रश्न समजून घेऊन पुनर्वसन मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. सिडको अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन तसेच लेखी पत्र खासदार सुनील तटकरे यांनी दिले. त्यांचा मान राखून आम्ही उपोषणास तूर्तास स्थगिती देत आहोत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH