मुंबई: ” अत्याधुनिक आरबोरिकल्चरच्या माध्यमातून ‘वृक्षांचे क्लिनिक’ उभारून महानगरपालिका क्षेत्रात निधी आणि धोरणात समावेश करून ‘वृक्षांचे साहित्य’ आणि ‘उत्सव’ साजरा करू, अशी स्पष्ट ग्वाही मुंबई शहराचे पालकमंत्री आणि माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली”

ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज’ या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद — वृक्षवर्धन २०२६ —मुंबईतील हॉटेल सहारा येथे सुरू झाली. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेत आशिष शेलार यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

यावेळी ATCA संघटनेचे संचालक वैभव राजे, संचालक नकुल सावनी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे CEO आर्यन पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले,” प्रदूषणाच्या समस्या ही मुंबई दिल्लीसह जगभरातील अनेक शहरांमध्ये भासत आहे.
सर्वत्र निसर्गाने माणूस यांमधील द्वंद्व सुरू आहे.”
आंतरराष्ट्रीय अर्बोरिकल्चर परिषदेच्या निमित्ताने या सर्व समस्यांवर पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपाय काढण्याचे पाहून मला समाधान वाटत आहे. पारंपरिक वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अपेक्षित परिणाम मिळाले नाही हे वास्तव आहे, असे मंत्री शेलार म्हणाले.

आपला देश आपल्या राज्य आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये वृक्षाचा समावेश आहे. माणसांप्रमाणे झाडावर देखील उपचार होऊ शकतात म्हणून झाडांचे क्लिनिक मला या परिषदेमध्ये पाहायला मिळाले. भविष्यातील पर्यावरण संरक्षणासाठी कल्चरचा धोरणात समावेश करून त्यासाठी आवश्यक तो खर्च देखील केला जाईल, असे मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून आशिष शेलार यांनी झाडाचे साहित्य ( Tree literature) आणि झाडाचा उत्सव (Tree festival) या संकल्पना मांडत शास्त्रीय पद्धतीने वृक्षांचे संवर्धन आणि ‘एक पेड मा के नाम’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घराघरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे CEO आर्यन पांडे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अरबोरीकल्चर परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

उद्या ८ मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी २:०० वाजता परिषदेस उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सदिच्छा दूत व प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा मुख्य वक्त्या असणार आहेत. जागतिक तज्ञांच्या सत्रांसह शहरी वृक्षसंवर्धन, अरबोरिकल्चर पद्धती आणि हवामान बदल या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.