कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज कोल्हापूर येथे काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत कुटुंबीयांना धीर दिला.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा तसेच सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. त्यांच्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. शिक्षणासोबतच आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण काम उभे केले. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना त्यांनी समाजातील विविध घटकांशी जोडलेले नाते जपले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याचा ठसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.