पनवेल रेल्वे स्थानकाच्या अगदी काही अंतरावर गुरुवारी दुपारी मालगाडी रुळावरून घसरल्याने सीएसटीएन – जेएनपीटी या लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मालगाड्यांची ताशी मोठ्या प्रमाणात ये-जा असणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर झालेल्या या अपघातामुळे तात्पुरता गोंधळ निर्माण झाला. दिवसाला सुमारे १३० मालगाड्या धावणाऱ्या या मार्गावर ही घटना झाल्याने रेल्वे प्रशासन सतर्क झाले. या अपघातानंतर काही तास मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असली तरी प्रवासी वाहतूकीला कोणताही त्रास जाणवला नसल्याचा दावा पनवेल रेल्वे प्रशासनाने केला आहे.

रेल्वे नियंत्रण कक्षाकडून दुपारी ११ वाजून २८ मिनिटांनी मिळालेल्या माहिती नुसार, सीएसटीएन-जेएनपीटी ४५ बीएलसी मालगाडी पनवेल स्थानकाच्या पाचव्या फलाटाजवळून जात असताना एका कंटेनर ट्रॉलीचा १२ वाजून २५ मिनिटांनी अपघात झाला आणि ती रुळावरून घसरली. ही घसरण कलंबोलीकडे जाणाऱ्या पॉईंटवर आणि फलाट (प्लॅटफॉर्म) क्रमांक ५ च्या क्रॉस-ओव्हर पॉईंटवर झाली. त्यामुळे अप-डाउन मुख्य लाईनवरची वाहतूक प्रभावित झाली. अपघातग्रस्त कंटेनर नंतर प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आला. घटनास्थळ नवीन पनवेल पुलाखाली असल्याने स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जेएनपीटीकडे जाणारी ही मालगाडी वळणावर येताच काही डबे डगमगले आणि रुळाबाहेर गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी काही डब्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.