मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. शैलेश भैसारे, प्रा. संजय इंगोले, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, डॉ.संगीता घाडगे, डॉ.सुरज बुलाखे, प्रा. प्रितेश जोशी, प्रा. अक्सा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लोकनेते गोपीनाथजी मुंडे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी कु. सुहानी दुर्गवले हिने सर्वांचे शाब्दिक स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शिक्षकांच्या वतीने नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या कु. इकरा दाभिळकर, कु. सम्यक सकपाळ, प्रथमेश जाधव, निनाद सकपाळ यांच्याबरोबरच द्वितीय व तृतीय वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांमधून जाशीन कडवेकर व कु. प्रियांका नगरकर या विद्यार्थ्यांची ‘बेस्ट फ्रेशर’ म्हणून निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांनी महाविद्यालय व संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेताना सांगितले की, आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबरच आपल्या अंगी असलेल्या सुप्तगुणांनाही वाव द्यावा. यासाठी महाविद्यालयामध्ये एनएसएस, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदी विविध विभागांच्या मार्फत व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुहानी दुर्गवले हिने तर शेवटी आभार कु. वैभवी पवार हिने मानले.
मुंडे महाविद्यालयात नवागतांचा स्वागत समारंभ संपन्न..
