चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत उपनगराध्यक्षा सौ. रुपाली राकेश दांडेकर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
श्री. स्वकुळ साळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, पेठमाप येथे झालेल्या या कार्यशाळेत ५ ते १५ वर्षे वयोगटातील ८० हून अधिक मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वरदा येथील राज आर्ट्सचे तज्ज्ञ श्री.राज पालकर यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या विविध टप्प्यांचे प्रात्यक्षिक करून मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी नैसर्गिक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर वाढावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांमध्ये कला, सर्जनशीलता, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यात आली.
स्वतःच्या हातांनी गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्याचा अनुभव मिळाल्याने ८० हून अधिक बालगोपाळांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. “परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया” या संदेशासह कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष रोटेरॅक्टर सिद्धेश जाधव, सचिव रोटेरॅक्टर मृणाल करंजकर यांच्यासह रोटेरॅक्टर आकांक्षा गुरव, दिक्षा देवळेकर, अभिषेक कदम, श्रावणी कोतरे तसेच क्लबच्या इतर पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
