देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर सागरी क्रीडा आणि हौशी मासेमारीचा थरार अनुभवायला मिळत आहे. सागरी क्रीडेला चालना देण्यासोबतच हौशी मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी देवगड स्पोर्ट्स क्लब आणि देवगड अँगलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फिशिंग टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत देवगड परिसरातील स्थानिक अँगलर्ससह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतून अनेक हौशी मासेमार सहभागी झाले आहेत. समुद्राच्या लाटांशी सामना करत मासेमारीचे कौशल्य पणाला लावत सहभागी स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

देवगडचा निसर्गरम्य समुद्रकिनारा, अथांग समुद्र आणि परिसरातील पवनचक्क्यांच्या सान्निध्यात ही स्पर्धा रंगत असल्याने या स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. पहाटेपासूनच स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मासेमारीसाठी आवश्यक तयारी करून अँगलर्स समुद्रात उतरताना पाहायला मिळत आहेत.