पुणे : नुकत्याच संपन्न झालेल्या नामदार करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये मूळ चिपळूणच्या असलेल्या कलाकार सौ मीरा भागवत यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेत हे बक्षीस त्यांना दुसऱ्या वेळी मिळाले आहे. सौ मीरा भागवत यांनी ” नात्यास नाव आपुल्या ” या एकांकिके मध्ये शालेय वयातील मुलांना सांभाळणारी बाई ची भूमिका केली.
सदर एकांकिका धकाधकीच्या आयुष्यात पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष आणि मुले सांभाळणाऱ्या एका बाईचा मुलांना लागलेला लळा या विषयावर आधारित होती. वाढत्या मुलांना आईची न मिळणारी माया आणि जवळीक आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न या आजच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित एकांकिकेने सर्वांची मने जिंकली
सदर नामदार करंडक स्पर्धेमध्ये २४ एकांकिकांनी भाग घेतला होता.
सौ मीरा भागवत यांनी गेली अनेक वर्षे विविध अभिनय स्पर्धा, एकांकिका स्पर्धा आणि एकपात्री कार्यक्रमातून यशस्वी अभिनेत्री म्हणून वाटचाल केली आहे..
चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूल मधील संगणक विभागा मधील नोकरी सांभाळून त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, संस्कार भारती, राष्ट्र सेविका समिती या आणि अशा अनेक विविध संस्था संघटना यांच्या माध्यमातून अनेक वर्ष कार्य करून त्यांनी कलाक्षेत्रासाठी आपले योगदान दिले आहे. माखजन बुरंबाड गावच्या माहेरवाशीण असलेल्या मीरा भागवत यांच्यातील कलेचा गौरव आता नुकताच नामांकित कलाकारांकडून पुण्यामध्ये सुद्धा झाला आहे.
दिनांक ३० ऑगस्ट रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ अभिनेते व सिने कलावंत श्री प्रवीण तरडे आणि सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते व कवी श्री संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सौ मीरा भागवत यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये १५०००/- आणि अतिशय सुंदर सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल कलाक्षेत्रातील अनेक जुन्या जाणत्या सहकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून सौ मीरा भागवत यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
