रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा ६० वा जन्मोत्सव विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साधेपणाने आयोजित करण्यात आला. या निमित्ताने भाविकांनी दिलेल्या दानातून दोन रुग्णवाहिका आणि एका अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर आणि सामाजिक कार्यकर्त्या उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगद्गुरूंच्या प्रेरणेतून जनसेवेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवेला अधिक बळ मिळणार आहे. विशेषतः अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी या रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहेत. या तीन रुग्णवाहिकांच्या समावेशामुळे संस्थेच्या रुग्णवाहिका ताफ्याची संख्या आता ५६ झाली आहे.
जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातून पर्यावरण संवर्धन आणि जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निघालेल्या सात वसुंधरा पायी दिंड्या श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे दाखल झाल्या होत्या. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून नाणीजधाममध्ये पोहोचलेल्या धामयात्रींच्या सहभागामुळे जन्मोत्सवाला विशेष आध्यात्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी जगद्गुरूंचे दर्शन घेतले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून जन्मोत्सव सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा ६० वा जन्मोत्सव उत्साहात साजरा…!
