दापोली : आंतरराष्ट्रीय समुद्र किनारे स्वच्छता दिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील कर्दे ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन राबवलेल्या किनारा स्वच्छता मोहिमेचं सद्या तालुक्यात विशेष कौतुक होतंय. कर्दे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच सचिन तोडणकर यांनी किनारा स्वच्छता मोहिमेसाठी घेतलेल्या या पुढाकाराला रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीयुत मनोज जिंदाल यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली समुद्रकिनारा स्वच्छता मशीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं योगदान विशेष महत्वाचं ठरलं आहे. याच मशीनच्या माध्यमातून कर्दे येथील समुद्रकिनाऱ्यावरील कचरा व घाण साफ करण्याचे काम केलं जातंय.
मात्र या किनारे स्वच्छता मोहिमेचं विशेष कौतुक केलं जातंय ते स्वच्छतेला पर्यावरण संवंर्धनाची जोड देऊन किनाऱ्यावरील जैवविविधता जपण्यासाठी देखील घेण्यात आलेल्या पुढाकारामुळे. सरपंच सचिन तोडणकर या कृषी क्षेत्रातील उच्च पदवी भुषित सरपंचाने ‘जैवविविधता हिच आपली श्रीमंती.. तिचे संरक्षण आणि संवंर्धन हाच आपला विकास.. आणि तीच जगाला दाखवणे हेच आपलं पर्यटन.’ हा खऱ्या पर्यटनाचा मुलमंत्र घेऊन गावकऱ्यांच्या साथीने सुरु केलेली ही मोहीम दापोलीच्या पर्यटन क्षेत्राचे भविष्य उज्वल करणारं महत्वाचं पाऊल ठरतंय.
समुद्रकिनारा म्हणजे केवळ पर्यटनाचे आकर्षण नव्हे, तर तो एक अत्यंत संवेदनशील आणि समृद्ध नैसर्गिक परिसंस्थेचा भाग आहे. समुद्राच्या लाटा, भरती-ओहोटी, वारे आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे किनारपट्टीवरील वाळूची धूप आणि पर्यावरणीय असमतोलाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक संरक्षण करणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित होत असताना, दापोली तालुक्यातील कर्दे ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला आहे. कर्दे समुद्रकिनाऱ्यावरील मारवेल (Ipomoea pes-caprae) या नैसर्गिक वेलवर्गीय वनस्पतीचे संरक्षण करण्याबरोबरच समुद्रकिनारा स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
समुद्रकिनाऱ्याच्या वाळूत नैसर्गिकरित्या वाढणारी मारवेल ही वनस्पती दिसायला साधी असली तरी किनारी परिसंस्थेत तिची भूमिका महत्त्वाची आहे. जमिनीवर पसरणाऱ्या तिच्या वेली आणि मुळांमुळे वाळूला धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वाऱ्यामुळे होणारी वाळूची अनावश्यक हालचाल कमी होण्यास हातभार लागतो.
समुद्रकिनाऱ्यावर तयार होणारे नैसर्गिक वाळूचे पट्टे आणि ढिगारे स्थिर ठेवण्याच्या प्रक्रियेत अशा वनस्पतींचे योगदान असते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासोबतच किनारपट्टीच्या पर्यावरणीय स्थैर्यासाठीही मारवेल महत्त्वाची ठरते.
मात्र, पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे समुद्रकिनाऱ्यावर वाहनांची ये-जा, अनियंत्रित वावर, कचरा, बांधकामासाठी वाळू आणि नैसर्गिक वनस्पतींचे नुकसान यामुळे या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे “मारवेल तण नाही, तर किनाऱ्याचे नैसर्गिक संरक्षण करणारी वनस्पती आहे” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
कर्दे ग्रामपंचायतीने या विषयाकडे केवळ स्वच्छता मोहिमेच्या दृष्टीने न पाहता, किनाऱ्याची नैसर्गिक परिसंस्था जपण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली आहे.समुद्रकिनारा स्वच्छ ठेवताना तेथील नैसर्गिक वनस्पतींचे नुकसान होऊ नये, वाळूचे नैसर्गिक पट्टे अबाधित राहावेत आणि पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही या संवर्धन प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
किनाऱ्यावर पडणाऱ्या
घनकचऱ्यामुळे समुद्री जीवसृष्टीबरोबरच किनारी वनस्पतींवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी हातात हात घालून राबविणे गरजेचे आहे.
दापोली तालुक्याला मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. कर्दे, लाडघर, मुरूड, केळशी, आंजर्ले, हर्णे यांसह अनेक किनारी भाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मात्र या किनाऱ्यांचे आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी केवळ पर्यटन सुविधा वाढविणे पुरेसे नाही; किनाऱ्याची नैसर्गिक परिसंस्था जपणेही तितकेच आवश्यक आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील मारवेलसारख्या वनस्पतींबरोबरच किनारी भागात आढळणाऱ्या स्थानिक वृक्ष-झुडपांचे संवर्धन, खाडी व नदीमुख परिसरातील मॅन्ग्रोव्हचे संरक्षण आणि नैसर्गिक वाळूचे पट्टे अबाधित ठेवणे आवश्यक आहे.
करंज, उंडी, केवडा, भेंड यांसारख्या स्थानिक प्रजातीही किनारी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे स्थानिक परिस्थितीला अनुरूप असलेल्या प्रजातींचे संवर्धन करण्याची दिशा भविष्यातील किनारपट्टी व्यवस्थापनात महत्त्वाची ठरू शकते. समुद्रकिनारा वाचविण्याची सुरुवात समुद्राच्या लाटांपासून नव्हे, तर किनाऱ्यावर उगवलेल्या एका छोट्याशा वेलीपासूनही होऊ शकते. कर्दे ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल केवळ एका समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता दापोलीच्या संपूर्ण किनारपट्टीसाठी एक पर्यावरणपूरक दिशा ठरू शकते.
समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षक कवच वाचवण्यासाठी कर्दे ग्राम पंचायतचा पुढाकार!दापोलीच्या किनारपट्टी संवर्धनासाठी ‘मारवेल’ वाचवा उपक्रम..
