मंडणगड : जिल्हा परिषद केंद्रशाळा देव्हारे येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वक्तृत्व, निबंधलेखन, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आणि नवनियुक्त पदवीधर शिक्षिका मनीषा ठोंबरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय जीवनात विविध स्पर्धा आणि उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व अभिव्यक्ती कौशल्य विकसित होते, निबंधलेखनातून विचारशक्तीला चालना मिळते, चित्रकलेतून कल्पनाशक्ती विकसित होते, तर रांगोळी स्पर्धेमुळे कलात्मकतेला वाव मिळतो. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना भविष्यातही विविध क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रकाशन. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात आणि अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची सवय लागावी, या दृष्टीने ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. यावेळी शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर,केंद्रप्रमुख रजनी जाधव, उपमुख्याध्यापिका विद्या पवार, पदवीधर शिक्षक नितेश हुंबरे, पदवीधर शिक्षिका मनिषा ठोंबरे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिनेश बोबले, सदस्य प्रगती धामणे,मनिषा बडत यांच्यासह शाळेतील विद्यार्थीवर्ग सह मान्यवर उपस्थित होते.
देव्हारे जि.प.केंद्रशाळा येथे वक्तृत्व, निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान…
