खेड : निसर्गाचा लहरीपणा, शेतीसमोरील वाढती आव्हाने आणि आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. खेड तालुक्यातील सुसेरीसह खाडीपट्ट्यातील महिला आपल्या शेतात विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि भाजीपाला पिकवून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करत आहेत. घरच्या शेतीत घाम गाळून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही कष्ट, जिद्द आणि नियोजनाच्या जोरावर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सुसेरी परिसरातील महिलांना उपलब्ध पाणीसाठा आणि नातुनगर धरणाच्या कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होत आहे. या पाण्याच्या नियोजनबद्ध वापरातून महिलांनी भाजीपाला उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. मेथी, मुळा, पावटा, चवळी, तूर, काकडी, कोथिंबीर, वांगी, घेवडा आणि कलिंगड यांसारखी पिके घेऊन त्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करत आहेत.
स्थानिक भाजीपाल्याला ग्राहकांची पसंती
खेड शहरातील भरणे नाका, आठवडा बाजार तसेच सिद्धिविनायक मंदिर ते एसटी बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला टोपल्यांमधून ताजा भाजीपाला विकणाऱ्या महिला दिसतात. स्वतः पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविल्याने त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. घाटमाथ्यावरून येणाऱ्या भाजीपाल्याच्या दरातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला पर्याय म्हणून पसंती मिळत आहे. तुलनेने परवडणाऱ्या दरात ताजा भाजीपाला उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचाही त्याकडे कल वाढत आहे.
या महिलांच्या शेतात पिकणारा भाजीपाला केवळ खेड तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. मुंबईतील बाजारपेठांपर्यंतही तो पोहोचत असल्याने ग्रामीण भागातील शेतीला व्यापक बाजारपेठ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
बचत गटांचा आधार, कष्टांतून समृद्धी
अनेक महिला बचत गटांमध्ये सहभागी असून बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचा उपयोग त्या बियाणे खरेदी आणि शेतीच्या गरजा भागविण्यासाठी करतात. मर्यादित भांडवल, उपलब्ध साधनसामग्री आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्या भाजीपाला उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. या शेतीतून मिळणारे उत्पन्न त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत असून महिलांना आर्थिक निर्णयांमध्येही अधिक सक्षम बनवत आहे.
निसर्गाच्या संकटातही जिद्दीचा आदर्श
यंदाच्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातच चक्रीवादळांच्या संकटाने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढवल्या. अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता नव्या पिकांचे पर्याय शोधणे, शेतीत विविध प्रयोग करणे आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
सुसेरी आणि खाडीपट्ट्यातील महिलांनी भाजीपाला शेतीतून उभा केलेला स्वावलंबनाचा मार्ग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. मात्र, या प्रयत्नांना अधिक बळ देण्यासाठी कृषी विभागाने महिलांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण, सुधारित बियाणे, पीक नियोजन, बाजारपेठेची माहिती आणि आवश्यक आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महिला केवळ कुटुंबाचा आधार नसून आर्थिक परिवर्तनाच्या वाहकही ठरू शकतात, हे सुसेरीतील या कष्टकरी महिलांनी सिद्ध केले आहे. काळ्या आईची मशागत करत हिरव्या पालेभाज्यांतून आर्थिक समृद्धीची बीजे पेरणाऱ्या या महिला खेड तालुक्यातील खऱ्याखुऱ्या ‘नवदुर्गा’ ठरत आहेत.
