रोहा : तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याच्या दुरुस्ती, साफसफाई आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर बळीराजा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कोलाड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला. कालव्याची प्रलंबित दुरुस्ती आणि साफसफाई तातडीने सुरू करावी, तसेच नियोजनानुसार डिसेंबरअखेर कालव्याला पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी फाऊंडेशनच्या वतीने गुरुवारी (दि. १५) निवेदनाद्वारे करण्यात आली.
संभे, पाले यांसह विविध ठिकाणी कालव्याच्या अस्तरीकरणाची (लायनिंग) कामे अपूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तसेच बारसोली गावातील ड्रेनेजची साफसफाई करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, कालव्याच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. कालव्याशी संबंधित सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
डिसेंबरअखेर पाणी न सोडल्यास आंदोलन
कालव्याला डिसेंबरअखेर पाणी सोडण्याची कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल. गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला. त्यामुळे यंदाही आंबेवाडी–निवी कालव्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
“करोडो रुपये खर्च झालेल्या कालव्याचे पाणी आमचे हक्काचे आहे. ते कोणीही रोखू शकत नाही, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे,” अशा शब्दांत बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव यांनी प्रशासनाला सुनावले.
पाच-सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी विभागातील शेतकरी बळीराजा फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच-सहा वर्षांपासून सातत्याने आंदोलन आणि पाठपुरावा करत आहेत. मागील दोन वर्षांपासून कालव्याला अंशतः पाणी सोडण्यात आल्याने परिसर हिरवागार झाला. भाजीपाला उत्पादक आणि पोल्ट्री व्यावसायिकांना त्याचा फायदा झाला, तर विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धताही सुधारल्याचे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पाण्यासाठी यापूर्वी मोर्चे, उपोषणे आणि आंदोलने करावी लागली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या कालव्याचे पाणी नियमितपणे उपलब्ध व्हावे, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी फाऊंडेशनने केली आहे.
महिनाभरात दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन
बळीराजा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपअभियंता सचिन कदम यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. यावेळी कदम यांनी सोमवारपासून कालव्याच्या साफसफाईला सुरुवात करण्यात येणार असून, महत्त्वाची दुरुस्तीची कामे महिनाभरात पूर्ण केली जातील, असे सांगितले. तसेच डिसेंबरअखेर कालव्याला पाणी सोडण्याचे नियोजन असून, त्यानुसार पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, सचिव ॲड. दीपक भगत, उपाध्यक्ष तुकाराम भगत, महेश कांबळे, शरद जाधव, जितेंद्र जाधव, भूषण मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
“पाणी आमच्या हक्काचे; अन्यथा आंदोलनाला सामोरे जा”
“पाणी आमच्या हक्काचे आहे. त्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पाटबंधारे विभागाने डिसेंबरअखेर कालव्याला पूर्ववत पाणी सोडावे; अन्यथा होणाऱ्या आंदोलनाला सामोरे जावे,” असा इशारा बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव यांनी दिला.
