चिपळूण (ललेश कदम) : तालुक्यातील हॉटेल, बियर बार आणि परमिट रूम व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या कमर्शियल गॅसचा पुरवठा मागील काही दिवसांपासून खंडित झाल्याने व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका बियर बार परमिट रूम हॉटेल असोसिएशनच्या वतीने मंगळवार, दि. 10 मार्च रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन गॅसचा सुरळीत पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय पूर्णपणे कमर्शियल गॅसवर अवलंबून असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने ग्राहकांना सेवा देणे कठीण झाले असून ग्राहकांची गैरसोय होत आहे. तसेच व्यवसाय ठप्प होण्याच्या स्थितीत आल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कमर्शियल गॅसचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
हे निवेदन सहाय्यक महसूल अधिकारी शिल्पा उमेश गिज्जेवार यांनी स्वीकारले. यावेळी चिपळूण तालुका बियर बार परमिट रूम हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष किशोर रेडीज, उपाध्यक्ष सुहास चव्हाण, सेक्रेटरी प्रथमेश कापडी, खजिनदार मिलिंद गोंधळी यांच्यासह हिदुराव पवार, देवेंद्र मोरे, सागर तांबोळी, मिथुन जाधव, बापू कपाडी, प्रवीण सावंत आदी सदस्य उपस्थित होते.
कमर्शियल गॅसचा पुरवठा खंडित; चिपळूण तालुका बियर बार परमिट रूम हॉटेल असोसिएशनचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
