मंडणगड : मंडणगड येथे श्री हनुमान जागृत सुवर्णकार मंडळ, रजि. मुंबई आणि पणदेरी सोनारवाडी ग्रामीण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा १६ सप्टेंबर २०२६ रोजी श्री हनुमान मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, श्री हनुमान पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आली. कै. अशोक रघुनाथ पालकर यांच्या आकस्मिक निधनामुळे यंदाचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सचिन पालकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष रमाकांत पालकर, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष मनोहर नगरकर, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा रेश्मा सुरेश पालकर, ग्रामीण महिला अध्यक्षा जयश्री जयवंत पालकर यांच्यासह समाजातील मान्यवर, महिला मंडळाच्या सदस्या, युवामंचाचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विलास नगरकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिलीपासून पदवीधर स्तरापर्यंत शिक्षण घेणाऱ्या तसेच कला, क्रीडा, अभियांत्रिकी व उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या पीयूष सतीश नगरकर याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्य हे यशाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सचिन पालकर यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने मेहनत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पालकर यांनी केले, तर आभार रमाकांत पालकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवामंचाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
पणदेरी येथे शैक्षणिक पारितोषिक व गुणगौरव सोहळा उत्साहात…
