चिपळूण : चिपळूणमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम पद्धतीने राखणाऱ्या चिपळूण पोलिसांनी यावर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. मुख्य पोलीस ठाण्याच्या बाजूला सिंहासनावर विराजमान असलेली भव्य गणेशमूर्ती स्थापित करण्यात आली आहे. चिपळूणचे लोकप्रिय डीवायएसपी प्रकाश बेले आणि कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी गणेशोत्सव साजरा करत आहेत. चिपळूणमध्ये अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या गणेशमूर्तीचे वाजतगाजत विसर्जन करण्यात येते.
चिपळूण नगरपरिषदेच्या कर्मचारी वृंद गणेशोत्सव मंडळातर्फे पालिकेच्या आवारात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुख्याधिकारी संजय जाधव आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष तथा उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे व त्यांचे सर्व सहकारी उत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देत आहेत.
चिपळूण शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश चिपळूण पालिकेच्या गणेशोत्सव मंडळातर्फे दिला जात आहे. भव्य शामियान्यात शाडूच्या मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती विराजमान असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूण पालिकेसमोरच अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलाच्या आवारात श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्यातर्फे यंदाही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाच्या उत्सवाचे हे ७५वे वर्ष आहे. मंडळातर्फे पर्यावरणपूरक आणि ध्वनिप्रदूषणविरहित आनंददायी वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने संगीत, भजन, पाककला स्पर्धा, श्री गणेश गौरव पुरस्कार, नमन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
