दापोली : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या पार्थ विनायक सामल (टी.वाय.बी.एस.सी.) व जान्हवी आशुतोष डोंगरे (एफ.वाय.बी.एस.सी.) या संघाने मराठी वादविवाद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील विद्यापीठ विद्यार्थी भवन, चर्चगेट येथे झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
मुंबई विद्यापीठाच्या १२ झोनमधून तब्बल ३५ संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. ‘शाश्वत विकास हा प्रगतीचा व्यावहारिक व साध्य करण्याजोगा मार्ग आहे’ या विषयावर झालेल्या वादविवादात जान्हवीने विषयाच्या बाजूने, तर पार्थने विषयाच्या विरोधात प्रभावी मांडणी केली.
विशेष म्हणजे, पार्थने गतवर्षीही याच स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर जान्हवीने नुकत्याच झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले होते. त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे साहित्य स्पर्धा प्रकारात महाविद्यालयाचा दबदबा यंदाही कायम राहिला आहे.
पार्थ व जान्हवी यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे व साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. तेजस मेहता व प्रा. जान्हवी दिवेकर यांनी संघव्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनशाम साठे
यांनी पार्थ व जान्हवी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
