रोहा : श्रीवर्धन तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, रोहा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे श्रीवर्धन उपतालुका प्रमुख श्री. शब्बीर भाई उंडरे यांनी आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
खासदार सुनीलजी तटकरे आणि आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. शब्बीर भाई उंडरे यांच्या या पक्षप्रवेशामुळे श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
“मी एक आलो, पण एक हजारोंच्या बरोबरीने काम करणार!”
पक्षप्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना शब्बीर भाई उंडरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“मी एक आलो असलो तरी एक हजार कार्यकर्त्यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करणार आहे. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीवर्धन तालुका प्रमुख मंदार तोडणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तालुक्यात चांगले काम करत आहेत. त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना आणखी मजबूत करण्याचा निर्धार शब्बीर भाई उंडरे यांनी व्यक्त केला.
तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी प्रयत्न
खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि जोमाने करण्याची ग्वाही यावेळी शब्बीर भाई उंडरे यांनी दिली.
या पक्षप्रवेशामुळे श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय संघटनेला नव्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली असून, आगामी काळात तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी या नव्या समीकरणाची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाला आमदार अनिकेत भाई तटकरे, श्रीवर्धन तालुका प्रमुख मंदार तोडणकर, बोर्ली पंचतन शहरातील कार्यकर्ते, रोहा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, श्रीवर्धन पंचायत समिती सभापती तसेच मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.
श्रीवर्धन तालुक्यातील या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, शब्बीर भाई उंडरे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद कितपत वाढते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
