श्रीवर्धन (संदेश घोलप) : आधुनिक युगात संगणक, टीव्ही आणि मोबाईलच्या आभासी विश्वात हरवत चाललेल्या आजच्या पिढीला मातीचा सुगंध आणि शेतीचे खरे महत्त्व कळावे, या उद्देशाने श्रीवर्धन तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा, वावेलवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी विशेष भातलावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी थेट शेतात उतरून भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
केवळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून न थांबता शाळेतील शिक्षक स्वतः चिखलात उतरले. त्यांनी हातात नांगर धरून शेतीची विविध कामे केली. शिक्षकांना अशा प्रकारे शेतात काम करताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह दुपटीने वाढला. गुरुजींनी कृतीतून दिलेल्या या धड्यामुळे मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.
शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शेतातील लाल चिखलात पाय ठेवत भातलावणी केली. शिक्षकांच्या सोबतीने चिखलात काम करताना मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. निसर्गाच्या सान्निध्यात राहून प्रत्यक्ष शेती कशी केली जाते, हे विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले.
या उपक्रमात स्थानिक शेतकरी श्री. सुरेश निवाते, श्री. राजू रामाणे, श्री. रमेश खाडे तसेच स्थानिक महिला मंडळाने विशेष सहभाग घेतला. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भाताची रोपे कशी धरावीत, त्यांची जुडी कशी तयार करावी आणि चिखलात ती योग्य पद्धतीने कशी रोवावीत, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वतःच्या हाताने भाताची रोपे शेतात लावली. “आपण रोज जे अन्न खातो, त्यामागे शेतकऱ्याचे किती अथांग कष्ट असतात,” याची जाणीव या वेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनाही झाली. त्यामुळे घामातून मोती पिकवणाऱ्या बळीराजाविषयी मुलांच्या मनातील आदराची भावना अधिक दृढ झाली.
निसर्गाच्या कुशीत आणि कोकणातील पारंपरिक लोकगीतांच्या सुरावटीवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रमदानाचा मनसोक्त आनंद लुटला. हा उपक्रम केवळ प्रात्यक्षिक न ठरता विद्यार्थ्यांसाठी एक ‘जिवंत कार्यशाळा’ ठरला. “शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन राबविलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे येणारी नवी पिढी आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि निसर्गाशी अधिक घट्ट जोडली जाईल,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
