मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काठावर पास झालेले आमदार रोहित पवार यांनी काल गडचिरोलीत एक पूल कोसळल्याबद्दल ट्विट करून आरोप केले आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या पुलाच्या बांधकामाचा करारनामा 2020 मध्ये झाला, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. रोहित पवार, तुम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होतात. 2022 मध्ये पुलाचे पूर्ण बांधकाम करण्यात आले. या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, रोहित पवार सरकारचे घटक होते, आमदार होते. रोहित पवार यांनी दलालांचे, कंत्राटदारांचे सरकार म्हणून टीका केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात गडचिरोलीचा पूल बांधण्यात आल्याने या पुलाच्या बांधकामात उद्धव ठाकरे यांनी किती टक्केवारी घेतली याचे उत्तर द्यायला पाहिजे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी तोफ डागली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यात कोण श्रेष्ठ, हा प्रश्नच नाही. मूळ शिवसेना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची होती. उद्धव ठाकरे यांनी केवळ विधिमंडळ पक्षावर बोलण्याऐवजी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो’ हे म्हणायचे का सोडून दिले यावर आधी बोलावे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. तशी वेळ आली तर माझे दुकान बंद करेन, हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. मूळ शिवसेनेची अशी वैचारिक पडझड झाल्याने शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे मार्गक्रमण करत आहे. न्यायालयात काय निकाल लागायचा तो लागेल, पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी असल्याचे महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट केले आहे, अशा शब्दात संजय राऊत यांचा समाचार घेतला.
गडचिरोलीतील पूल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच बांधला गेला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी डागली तोफ…
