दापोली : रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांच्या वतीने ‘सिनर्जी २०२६’ अंतर्गत आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ७० पेक्षा अधिक रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये रुग्णांची फिजिओथेरपी तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार विविध फिजिओथेरपी उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये इलेक्ट्रोथेरपीसह विविध फिजिओथेरपी उपचारपद्धतींचा समावेश होता. यामध्ये पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, स्नायूंच्या व हाडांच्या समस्या तसेच इतर शारीरिक तक्रारींबाबत आवश्यक फिजिओथेरपी उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करताना, अशा प्रकारची आरोग्य शिबिरे भविष्यातही नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे मनःपूर्वक आभार मानले.
शिबिराच्या माध्यमातून फिजिओथेरपीबाबत जनजागृती करण्यासोबतच गरजू रुग्णांना तज्ज्ञ उपचार व मार्गदर्शन मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व कौतुकास्पद ठरला. या शिबिरामध्ये संस्थेचे संस्थापक डॉ संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, प्राचार्य डॉ अशोक निर्बाण, डॉ दीपक हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ तुषार लिंगायत, डॉ आयुष पितळे यांच्यासहित फिजियोथेरपी विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
