मंडणगड : राष्ट्रीय महामार्गावरील आंबडवे–लोणंद मार्गावर पालेकोंड–तुळशी दरम्यान ता.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास बोलेरो गाडीचा अपघात झाला. स्टीअरिंगचा बॉल जॉइंट तुटल्याने स्टीअरिंग लॉक होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जावळे गावातील आठ प्रवासी जखमी झाले.
या अपघातात गीता महाडिक, सुचिता भानसे, शिवानी शिगवण, आदित्य पवार, सायली पवार, कमलाकर भानसे, सिद्धी भानसे आणि सुजाता शिगवण हे जखमी झाले. सदर बोलेरो गाडी जावळे येथून मंडणगड कडे येत असताना पाले तुळशी दरम्यान आली असता अचानक स्टीअरिंगचा बॉल जॉइंट तुटल्याने स्टीअरिंग लॉक होवून गाडी डाव्या बाजूला कळंडून पलटी झाल्याची माहिती पुढे येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच जावळे पंचक्रोशीसह तालुक्यातील नातेवाईक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मदतकार्य केले. जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना माणगाव व मुंबई येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची प्राथमिक माहिती घेतली असून, दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि वाहनातील तांत्रिक बिघाडाबाबत अधिक तपास सुरू केला आहे.