खेड : राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचे भासवून काम करून देण्याचे आमिष दाखवत ५ हजार रुपये घेतल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने मंत्र्यांच्या नावाचा वापर करून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
याप्रकरणी फिर्यादी विद्याधर दाताराम साळुंखे (वय ५६) यांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपीचे नाव रविराज चिखले असे असून त्याचे पूर्ण नाव व इतर तपशील उपलब्ध नसल्याचे प्रथमदर्शनी नोंदीत नमूद आहे.
नेमके प्रकरण काय ?
फिर्यादी विद्याधर साळुंखे हे चिपळूण तालुक्यातील साळुंखेवाडी येथील रहिवासी असून मुंबई येथे एका कंपनीत लेखापाल म्हणून काम करतात. तक्रारीनुसार, चिपळूण तालुक्यातील अनधिकृत दगडखाणींमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याच्या विषयावर त्यांनी मंत्री योगेश कदम यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रविराज चिखले याने आपण मंत्री योगेश कदम यांचा पी.ए. असल्याचे सांगून संपर्क साधल्याचा आरोप आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित व्यक्तीने मंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे तसेच काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास खेड येथे फिर्यादीकडून ५ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पैसे घेतल्यानंतर टाळाटाळ केल्याचा आरोप
पैसे दिल्यानंतरही अपेक्षित काम झाले नाही. त्यानंतर फिर्यादीने संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादीने मुंबई येथे मंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयात भेट दिली. त्यावेळी संबंधित व्यक्ती हा मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक नसल्याचे समजल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(४) आणि ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण आप्पा येवले यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार असून, संबंधित आरोपीची बाजू किंवा पोलिसांच्या पुढील तपासाचा तपशील उपलब्ध नाही.