खेड : तालुक्यातील ग्रामीण भागासह खेड शहरात सोमवारी (दि. १९) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले व सोसाट्याचा वारा सुटला. तीन नंतर पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून हवामानात बदल जाणवत होता. त्यानंतर आज अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
तालुक्यातील खाडीपट्टा, सातगाव परिसर, खोपी, शिरगाव आदी भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शहरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर तालुक्यातील काही ग्रामीण भागांत मुसळधार सरी कोसळल्या.
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पावसामुळे काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाच्या सरींमुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी होती. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी खेडमध्ये आलेल्या नागरिकांना अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दुकानांच्या समोर काढलेले शेडमध्ये आडोशाला उभे अनेकांनी भिजण्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला. तर बसस्थानक परिसरात पावसापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांची धावपळ उडाली.
भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या सहायाने झाड बाजूला करून वाहतूक तत्काळ पूर्ववत करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ संतोष नलावडे, ग्रामसेवक प्रशांत आग्रे यांच्यासह अन्य स्थानिक रहिवासी उपस्थित होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, बदलत्या हवामानाचा परिणाम जनजीवनावर जाणवला.
खेड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी…उकाड्यापासून नागरिकांना दिलासा; भरणे येथे आंब्याचे झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा…
