लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी जाकादेवी हॉटेल ते आंजणारी पुलापर्यंतच्या मार्गावर नव्याने १८ गतिरोधक बसविण्यात आले आहेत. रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन सेफ’ अंतर्गत अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी केल्यानंतर ही उपाययोजना करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने रत्नागिरी पोलीस प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान लांजा तालुक्यातील आंजणारी परिसरातील अपघातांची परिस्थिती विशेषतः लक्षात घेण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, महामार्ग पोलीस, उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. अपघातांची कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
आंजणारी परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी यापूर्वी सात गतिरोधक बसविण्यात आले होते. मात्र, अपघातांची तीव्रता लक्षात घेता आणखी गतिरोधक बसविण्याची आवश्यकता होती. त्यानुसार अपघात रोखण्यासाठी पाऊल उचलत राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलीस प्रशासनाने ठेकेदार कंपनीला नवीन गतिरोधक उभारण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जाकादेवी हॉटेल ते आंजणारी पुलापर्यंतच्या मार्गावर नव्याने १८ गतिरोधक बसविण्यात आले आहेत. हे गतिरोधक एक ते दीड किलोमीटरच्या अंतराने बसविण्यात आले आहेत.
दरम्यान, महामार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नव्याने बसविण्यात आलेल्या गतिरोधकांजवळ वेग कमी करून सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
