कराड : शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नव्याने वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ गाडी ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात चार तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत.
कातरखटाव गावातील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ गाडीतून गेले होते. दर्शन घेऊन सर्वजण रात्रीच्या सुमारास आपल्या गावी परतत होते. दरम्यान, रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांची स्कॉर्पिओ गाडी एका ट्रकला पाठीमागून धडकली.
धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे तेजस देशमुख (वय २५ वर्षे), सागर निंबाळकर (वय २३ वर्षे), सुयश चिंचकर (वय २० वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय २१ वर्षे) अशी आहेत. तेजस देशमुख हा स्कॉर्पिओ गाडी चालवत होता.
तर ऋतुराज दुबळे (वय २१ वर्षे), शंतनू शिंगाडे (वय २० वर्षे) आणि अमन तांबोळी (वय २३ वर्षे) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, तसेच कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.
पोलीस आणि नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली असून, मृत तरुणांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
