मुंबई- राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. तळकोकणात ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याची प्रगती मंदावली होती. दक्षिण महाराष्ट्र आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या सुमारे १२ दिवसांपासून मान्सून रेंगाळलेला होता. मात्र आता वातावरणातील अनुकूल बदलांमुळे मोसमी वाऱ्यांना पुन्हा वेग मिळण्याची चिन्हे दिसत असून २३ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेत वाढ होत आहे. तसेच मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार होत असल्याने पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात मान्सूनच्या पुढील वाटचालीला गती मिळण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनने केरळ आणि महाराष्ट्रात वेळेपूर्वी हजेरी लावली होती. तळकोकणात 6 जूनला मान्सून दाखल झाला. मात्र त्यानंतर वातावरणातील काही प्रतिकूल परिस्थितींमुळे मोसमी वाऱ्यांची ताकद कमी झाली. परिणामी दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मान्सूनची पुढील प्रगती थांबली होती. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या सक्रियतेसाठी आवश्यक असलेली वाऱ्यांची अनुकूल रचना आणि कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव यामुळे ही स्थिती निर्माण झाली होती.