मुंबई- गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिंदे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील सध्याच्या दुष्काळावर सविस्तर भाष्य केलं. आम्ही शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे शिंदे यावेळी म्हणाले. तसेच शिंदे यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा केली. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल, अशी मोठी घोषणा केली. यावेळी भर भाषणातच त्यांनी शिवसेनेच्या खासदार, आदमारांना लग्न असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावांची यादी तयार करण्याचा आदेश दिला.
एकनाथ शिंदे करून दाखवणारा माणूस आहे. सध्या राज्यात दुष्काळ आहे. पण शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर आहे. आज बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे असते तर सण उत्सव बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांच्या मदतीला धावा, असे ते म्हणाले असते. तेच आम्ही करतो आहेत. शेतकऱ्यांना आम्ही दिवाळीचा शिधा देण्याचे काम सुरू केले आहे. विरोधकांचा एकही दिवस मला शिवा दिल्याशिवाय जात नाही. ते आमच्यावर टीका करतात. आम्ही कामातून उत्तर देत आहोत. आम्ही फक्त भाषण देणार नाहीत. आम्ही शेतकऱ्यांना राशन देणारे आहोत. आम्ही परभणीत 25 हजार शिलाई मशिनींचे वाटप केले. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलींना 25000 सायकलींचे वाटप करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. ज्या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न असेल त्या लेकीचे लग्न करण्याची जबाबदारी शिवेसनेने घेतली आहे. सामूहिक विवाहसोळे आयोजित केले जातील. शिवसेना कुठेही मागे राहणार नाही.
दुष्काळाच्या छायेत असलेल्या बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी सरकारने 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली असून ती वितरित करण्यास सुरुवात झाली असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. विरोधकांना थेट सवाल करत ते म्हणाले की, “आम्ही शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्या तोंडाने आमच्यावर आरोप करता? आम्ही दुष्काळग्रस्त भागात मदतीने भरलेले शेकडो ट्रक पाठवले आहेत, तुम्ही साध्या बिस्कीटाचा पुडा तरी तिथल्या लोकांसाठी नेला का? अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. शेतकऱ्यांच्या या कठीण प्रसंगात केंद्र सरकार पूर्ण ताकदीने राज्याच्या पाठीशी उभे असल्याची माहिती देताना त्यांनी केंद्र सरकारच्या आश्वासनांचा उल्लेख केला. “पंतप्रधानांनी मला आश्वासन देताना ‘शिंदेजी, चिंता करू नका’ असे सांगितले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘आम्ही शेतकऱ्यांच्या मागे खडकासारखे खंबीरपणे उभे आहोत’ असा शब्द दिला आहे,” असे शिंदेंनी स्पष्ट केले.
