मुंबई : दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटायचे सोडून त्याचा हसरा मेळावा करण्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाली आहे. काल जनाब संजय राऊत यांनी जी मुक्ताफळे उधळली आणि जावईशोध लावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हसत होता. असे जावईशोध लावण्याआधी आपल्या पक्षाचा शोध घेतला, तर आपली आणि आपल्या मालकाची अवस्था लॉरेल अँड हार्डी सारखी आणि ‘शोले’ मधल्या जेलर असरानी सारखी झाल्याचे त्यांच्या लक्षात येईल. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनी कॉमेडी शो ला लाजवेल असा शो शिवतीर्थावर केल्याची टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत, एप्रिलमध्ये सत्तांतर होणार असल्याचे सांगत आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, एक एप्रिलला एप्रिल फूल केले जाते. आजपर्यंत तुम्ही जनतेला एप्रिल फूल करत होता; आता उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना आणि स्वतःलाच एप्रिल फूल करून घेत आहात. राहिला प्रश्न राजकीय हत्येचा, तर हा देश संविधानाने आणि लोकशाहीने चालतो. इथे कुणाचीही राजकीय हत्या झालेली नाही. ज्यांचे अस्तित्व जनतेने नाकारले आहे, त्यांचे वेगळे अस्तित्व संपवण्याची गरज काय? विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत तुमची राजकीय हत्या करण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने केले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तर तुम्हाला भोपळाही फोडता आला नाही. लोकशाहीत जनता जनार्दन सर्वस्वी असते आणि निवडून कोणाला द्यायचे, कोणाला घरी बसवायचे, हे जनता ठरवत असते, असे श्री. बन यांनी फटकारले.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्र अतिशय सुरक्षित असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, त्यापेक्षा संजय राऊत, तुमची गँग कुठली आहे, ते महाराष्ट्राला सांगा. तुमच्या गँगला कॉमेडी करणे एवढेच जमते आणि त्यामुळे महाराष्ट्र तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्र देवेंद्रजींना तर देश अमितभाई शाह आणि मोदीजींना गांभीर्याने घेतो. म्हणूनच देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तीन वेळा निवडून दिले. देवेंद्रजी फडणवीस यांना तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दिले. महाराष्ट्राने तुम्हाला कॉमेडी सर्कसमधील एक पात्र म्हणून ओळखले आहे.
श्री. बन पुढे म्हणाले, कोकणामध्ये रिफायनरी आली की तिला विरोध करायचा, डेटा सेंटर आले की त्याला विरोध करायचा आणि मग म्हणायचे की सरकार रोजगार देत नाही. पुन्हा म्हणायचे की प्रकल्प गुजरातला जातात, प्रकल्प परराज्यांमध्ये जातात. संजय राऊत हे डबल ढोलकी वाजवण्यात एक्स्पर्ट आहेत. कुठलाही चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा. त्यामध्ये काही त्रुटी असतील, काही चुका असतील, तर त्या सरकारच्या निदर्शनास नक्की आणून द्या, कारण विरोधक म्हणून तुमचे ते काम आहे. सरकार त्या दुरुस्त करेल. परंतु सरसकट प्रकल्पांना विरोध करणे अतिशय चुकीचे आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा, हे उबाठा गटाचे अगदी सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यामुळेच आमचा कोकण परिसर मागास राहिला.