लांजा: श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक संजय नारायण मणचेकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर बेनी नदी पुलाजवळील धनावडे शेती फार्म या ठिकाणी झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवधे येथील रहिवासी असलेल्या संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा रिक्षा व्यवसाय असून रिक्षा संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. याशिवाय देवधे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून ते कार्यरत होते. संजय मणचेकर हे बुधवारी दुपारी लांजा येथून देवधे येथील आपल्या घरी जेवणासाठी रिक्षा घेऊन चालले होते. त्यांची रिक्षा धनावडे शेती फार्म या ठिकाणी आली असता समोर श्वान आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात रिक्षा पलटी झाली.

याच दरम्यान पाठीमागून रिक्षा घेऊन येणाऱ्या संजय मणचेकर यांचा चुलत भाऊ प्रकाश जानू मणचेकर याने रिक्षा पलटी झाल्याचे पाहिले. त्यानंतर त्याने आपल्या रिक्षातून संजय मणचेकर यांना लांजा येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर तिथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात ठिकाणी उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

संजय मणचेकर यांच्या या दुर्दैवी मृत्यूने लांजा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या पश्चात दोन मुलगे, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, या अपघाताबाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.